प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील दुकाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी यापूर्वी लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र, गाळय़ांचे भाडे जास्त असल्याने लिलाव प्रक्रियेवेळी कोणीच बोली लावली नाही. त्यामुळे दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. बुधवार दि. 6 रोजी दुपारी एक वाजता अनगोळ नाका, नवबागवेस- खासबाग आणि टिळकवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
महापालिकेचे विविध गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. नवबागवेस-खासबाग येथील व्यापारी संकुलातील दोन गाळे आणि त्यावरील हॉल भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. दुकानांसाठी एक लाख रुपये अनामत रक्कम आणि पाच हजार रुपये प्रति महिना भाडे ठरविण्यात आले आहे. हॉलसाठी 17 हजार रुपये भाडे, दोन लाख साठ हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेने निश्चित केली आहे. अनगोळ नाका येथील 300 चौ. फुटांची दोन दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. याकरिता पाच लाख रुपये अनामत रक्कम आणि 30 हजार रुपये भाडे महापालिकेने निश्चित केले आहे. टिळकवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेले 7 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून प्रत्येक गाळय़ाकरिता 25 हजार रुपये अनामत रक्कम आणि अकराशे रुपये प्रति महिना भाडे निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त बोली लावणे बंधनकारक आहे. सदर लिलाव प्रक्रिया अनगोळनाका येथील गाळय़ांच्या आवारात बुधवार दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.