प्रतिनिधी / सातारा :
कण्हेर ता. सातारा परिसरात कामथी, अहिरेवाडी, कण्हेर व साबळेवाडी या चार गावांमध्ये गुरूवारी पहाटे 2 च्या सुमारास चोरट्यांनी घरे फोडून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. चोरटे कामथी येथील किरणा दुकान फोडताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
कण्हेर परिसरात गुरूवारी पहाटे चोरट्यांनी धुडगूस घातला. कामथी तर्फ सातारा येथील लालन संपत चव्हाण यांच्या मालकीचे असलेले वेदांती किरणा स्टोअर्स हे दुकान फोडून गल्ल्यातील 53 हजाराची फोकड लंपास केली. तसेच कण्हेर येथील गणेशनगर वस्तीमधील दादासो सर्जेराव वाघमळे यांचे बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी दहा तोळे सोने व 60 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. कमथी येथील तीन घरे तर अहिरेवाडी व साबळेवाडी येथील प्रत्येकी एक घर फोडून साहित्य चोरले आहे.
गणेशनगर वस्तीतील रहिवासी पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी दादासो वाघमळे हे पत्नीसह रूग्णालयात उपचार घेत आहेत. वस्तीतील त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 6 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. गुरूवारी सकाळी त्यांचे नातेवाईक घरी आले असता चोरीचा प्रकार समोर आला. पोलीस कॉन्स्टेबल शिंदे याबाबत अधिक तपास करत आहेत.