प्रतिनिधी/ कोल्हापूर
शहरातील कनाननगर झोपडपट्टीतील तरूणाचा स्वॅब रिपोर्ट गुरूवारी पॉझिटिव्ह आला. तो मुंबईहून बुधवारी पहाटे कोल्हापुरात आला. टॉयफाईडचा त्रास सुरू झाल्याने तो सीपीआरमध्ये दाखल झाला होता. गेल्या दोन दिवसांत मुंबईहून जिल्हय़ात आलेल्या दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात भुदरगड तालुक्यातील एक आहे. तीन दिवसांत मुंबईतून कोल्हापुरात आलेल्या तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ात कोरोनाचा धोका वाढला आहे.
मुंबईतून सावंतवाडीमार्गे भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील चालकाचा स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुंबईतून ट्रकने कोल्हापूरमार्गे हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे निघालेल्या तरूणाची वैद्यकीय तपासणी केली. त्याचा स्वॅब रिपोर्ट बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 14 वर पोहोचली. दरम्यान, मुंबईतून ट्रकने कोल्हापुरात आलेल्या कनाननगर येथील झोपडपट्टीतील तरूणाचा कोरोना रिपोर्ट गुरूवारी रात्री पॉझिटिव्ह आला. जिल्हय़ातील हा 15 वा पॉझिटिव्ह रूग्ण आहे.
त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार
कनाननगर येथील झोपडपट्टीत हा 36 वर्षीय तरूण रहात होता. तो बुधवारी मुंबईतून मिळेल त्या वाहनाने निघाला होता. ट्रकने तो पहाटे कोल्हापुरात घरी आला. त्याला टॉयफाईडचा त्रास सुरू झाल्याने तो उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर कोरोना अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.