वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टय़ूबरकुलॉसिस (टीबी)च्या चाचणीत वापरल्या जाणाऱया निदान यंत्रांचा वापर आता कोविड-19 रुग्णांची पुष्टी तसेच स्क्रीनिंगसाठी केला जाणार आहे. यासंबंधीची माहिती देशातील आरोग्य संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. चाचणीची क्षमता वाढविण्यासाठी आयसीएमआरने 10 एप्रिल रोजी ट्रूनॅट यंत्रणेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता आयसीएमआरने यासंबंधी दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. ही यंत्रणा आता कोविड-19 बाधिताची पुष्टी तसेच स्क्रीनिंगसाठी वापरता येणार असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे.
या यंत्राद्वारे चाचणीला कमाल 35 ते 45 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. हे आधुनिक यंत्र विजेशिवाय देखील चालू शकते. यंत्रात एक बॅटरी असून 45 मिनिटांपर्यंत त्याचा बॅकअप प्रापत होतो. दोन पाळय़ांमध्ये चाचणीसाठी तंत्रज्ञ नेमल्यास दिवसात 30 ते 40 नमुन्यांची चाचणी पूर्ण होऊ शकते.
कोविड-19 संसर्गाच्या संशयिताचे सर्व नमुने घेतले जाणार आहेत. या नमुन्यांची सर्वप्रथम ई जीन स्क्रीनिंग होणार आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आढळलेल्या संशयितांना पुढील टप्प्याला सामोरे जावे लागणार आहे. यात आरडीआरपी जीनची चाचणी होणार आहे. यातही पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधिताला कोरोनाची लागण झाल्याचे मानून उपचारासाठी पाठविले जाणार आहे. यानुसार सर्व पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवाल आयसीएमआर पोर्टलवर प्रसारित करणे अनिवार्य आहे.
महामारीच्या या संकटाला तोंड देणाऱया जगभरात विषाणूच्या उच्चाटनासाठी संशोधन आणि अध्ययन केले जात आहे. यानुसार अनेक देशांमध्ये लस तसेच औषधांच्या निर्मितीवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच चाचण्यांचे स्वरुप अधिकाधिक सुलभ तसेच जलद करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला मोठय़ा प्रमाणावर यश देखील मिळत आहेत.