कन्याकुमारी
भाजपने वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना तामिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी होणाऱया पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शनिवारी घोषित केले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये कोविड-19च्या संसर्गामुळे काँगेस खासदार एच. वसंत कुमार यांचे निधन झाले होते.
भाजपने शुक्रवारी रात्री तामिळनाडूत होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकसोबत जागावाटप निश्चित केले आहे. अण्णाद्रमुकने भाजपला कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघासह 20 विधानसभा मतदारसंघ देऊ केले आहेत.
राधाकृष्णन हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कन्याकुमारी मतदारसंघातून विजयी झाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यमंत्री राहिले होते. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याच मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. राधाकृष्णन माजी अर्थ तसेच जहाजबांधणी राज्यमंत्री राहिले आहेत. तसेच भाजपचे ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.