प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच कापड दुकाने सुरू करण्यात आली. परंतु नागरिकांनी तितकासा प्रतिसाद दिला नव्हता. आता प्रशासनाने काही अटी घालून लग्नांना परवानगी दिल्यामुळे लग्न, जथ्यांसाठी गर्दी होवू लागली आहे. रविवारी सकाळपासूनच बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. कपडे खरेदीसाठी दुकानांकडून आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदावलेला कापड व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे.
कोरोनाचा धोका वाढू नये याकरिता कपडय़ांची दुकाने बंद केली होती. लॉकडाऊनपासून बंद असणारी दुकाने आठवडाभरापूर्वी सुरू करण्यात आली. यावर्षीचा लग्नसराईचा सिझन कोरोनामुळे गेल्यामुळे कापड व्यावसायिकांमध्ये नाराजी होती. अनेकांनी दिलेल्या आर्डर रद्द केल्या. कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला होता.
कोणताही सण-समारंभ असला की, पहिला खरेदी ही कपडय़ांची असते. बेळगावमध्ये स्वस्त दरात कपडे मिळत असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्हा व राज्यातील नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये येत असतात. रविवारी मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार परिसरात खरेदी करणाऱयांची गर्दी पहायला मिळाली. लग्न जथ्याबरोबरच इतर कपडय़ांची खरेदी करण्यात येत होती.
दुकानदारांकडून खबरदारी
मोठय़ा कापड दुकानांमध्ये दोन ते तीन ग्राहकांनाच आत घेतले जात आहे. ते ग्राहक बाहेर गेल्यानंतर पुढील ग्राहकाला आत बोलविण्यात येत आहे. आलेल्या ग्राहकांना मास्क व सॅनिटायझरची सक्ती करण्यात आलेली आहे. वेगवेगळय़ा भागांमधून ग्राहक बाजारात येत असल्यामुळे दुकानदारांना ही खबरदारी घ्यावी लागत आहे.