प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दक्षिण महाकाली भव्य प्रतिकृतीचे रविवारी अनावरण करण्यात आले. 16 फूट उंच अशी ही भव्य प्रतिकृती आहे. भाविकांना बेळगावमध्येच देशातील धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे यासाठी मागील वर्षापासून कपिलेश्वर मंदिरात हा उपक्रम राबविला जात आहे. बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.
तानाजी गल्ली येथील कलाकार वसंत पाटील यांनी ही आकर्षक मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे. मागील 15 ते 20 दिवसांपासून मेहनत घेऊन ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीसाठी विनायक पालकर यांनी विद्युत रोषणाई केली आहे. दसऱयापर्यंत बेळगावच्या भाविकांना या भव्य प्रतिकृतीचे दर्शन घेता येणार आहे.
यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलजकर, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राकेश कलघटगी, राहुल कुरणे, दौलत साळुंखे, दौलत जाधव, विवेक पाटील यासह इतर सदस्य उपस्थित होते.