प्रतिनिधी/ बेळगाव
कमकारट्टी (ता. बेळगाव) येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून पोलिसांनी 11 जुगाऱयांना अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून या अड्डय़ावरुन मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कमकारट्टी येथे अंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून 11 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून 1 लाख 67 हजार 630 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.
सोमवारपेठ कित्तूर येथील तौसीफ उस्तादसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरु होती. गेल्या पंधरवडय़ात बेळगाव शहर व परिसरातील मटका, जुगारी अड्डय़ांविरुध्द पोलिसांनी आघाडी उघडली आहे.
पत्रकात एकच नाव
नेहमी मटका, जुगारी अड्डय़ावरील कारवाईनंतर अटक करण्यात आलेल्यांच्या नावांसहीत पत्रक प्रसिध्दीस दिले जाते. गुरुवारी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रकारांत मात्र 11 पैकी केवळ तौसीफ उस्ताद या एकाच नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे जुगाऱयांची नावे बाहेर पडू नयेत याची पोलीस काळजी घेत आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे.