ऐन दिवाळीत ‘व्यावसायिकां’ना दणका -हॉटेलचे खाणे महागण्याचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक (कमर्शिअल) सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे हॉटेल्स-कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कमर्शिअल सिलिंडरचे दर वाढले असले तरी 14.2 किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.
नव्या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरचा दर दोन हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. राजधानी दिल्लीमध्ये कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1,734 रुपयांवरुन 2000.50 रुपये इतकी झाली आहे. तर मुंबईमध्ये 1,683 रुपयांना मिळणारा कमर्शिअल सिलिंडर आता 1,950 रुपये झाला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर 2,073.50 रुपये झाला. तर चेन्नईमध्ये कमर्शिअल सिलिंडरची किंमत देशात सर्वाधिक असून 2,133 रुपयांवर पाहोचली आहे.
मागील महिन्यात 14.2 किलो वजनाच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती. सध्या हे दर विविध शहरांमध्ये 900 ते 925 रुपयांच्या आसपास आहेत. आता पुन्हा कमर्शिअल सिलिंडरचे दर वाढल्यामुळे आधीच कोरोना संकट, दिवाळीतील खरेदी आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.