पटना साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए न्यायालयाचा निकाल
पटना / वृत्तसंस्था
पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने सोमवारी 9 दहशतवाद्यांना शिक्षा जाहीर केली आहे. विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश गुरविंदर सिंग यांनी चार दहशतवाद्यांना फाशीची, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच अन्य दोन दोषींना 10 वर्षे आणि एकाला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात दोषींना उच्च न्यायालयात अपील करायचे असल्यास 30 दिवसांच्या आत करावे, अन्यथा शिक्षेचा हा आदेश कायम ठेवला जाईल, असे एनआयए न्यायालयाने म्हटले आहे.
आठ वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेत बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्यात आली होती. याप्रकरणी 27 ऑक्टोबर रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने संशयितांना दोषी ठरविले होते. तसेच फखरुद्दीन या एका संशयिताची या प्रकरणातून सुटका केली होती. आता एनआयए कोर्टाने नोमान अन्सारी, हैदर अली उर्फ अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहम्मद मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी ऊर्फ आलम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच उमर सिद्दिकी आणि अझरुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सहाही दहशतवाद्यांना आयपीसीच्या कलम 302, 120-बी आणि यूएपीए कायद्यासारख्या गंभीर कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. एनआयएचे विशेष सरकारी वकील ललित प्रसाद सिन्हा यांनी या सर्वांना फाशी देण्याची मागणी केली होती. याशिवाय अहमद हुसैन आणि फिरोज आलम उर्फ पप्पू यांनाही न्यायालयाने 10 वर्षांची तर इफ्तिखार आलम याला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे इफ्तिखारच्या शिक्षेला आतापर्यंत 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2013 मधील प्रकरण
पटना येथील गांधी मैदान येथे ऑक्टोबर 2013 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. याच सभेमध्ये नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची घोषणा झाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर 31 ऑक्टोबर 2013 रोजी एनआयएने या प्रकरणाचा ताबा घेत 1 नोव्हेंबर रोजी दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदवले होते. त्यानंतर तपासाअंती एका अल्पवयीनासह 12 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर, अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाईल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.