वाहतुकीवर परिणाम
प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार महामार्ग सद्या अपघात प्रवण मार्ग झालेला असून दोन दिवसांतून एक तरी वाहन या मार्गावर अपघात ग्रस्त होत असल्याच्या घटना घडायला लागल्या आहेत. या मार्गावरील जीवघेणी वळणे, रस्ता रूंदीकरणासाठी लावलेला विलंब ही या मागील कारणे असल्याचे दिसत आहे. हमरस्त्यावरील या अपघातामुळे काही क्षण या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र काणकोणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
काल सोमवार दि. 12 रोजी मडगावच्या दिशेने जाणारे केए. 22 सी 4218 हे एक मालवाहू वाहन करमल घाटावर अपघात ग्रस्त झाले असून वाहन चालकाने प्रसंगावधान राखले नसते तर सदर मालवाहू वाहन करमल घाटावरील दरीत कोसळले असते. कारवारच्या दिशेने येणाऱया दुसऱया वाहनाला बाजू देताना ही घटना घडली अशी माहिती अपघात ग्रस्त वाहनाच्या चालकाने दिली.
सद्या गुळे ते माशे आणि त्यापुढील रस्त्याचे रूंदीकरण झालेले आहे. गुळे ते माशे पर्यंतच्या मनोहर पर्रीकर बगल रस्त्यामुळे अवघ्या 15 मिनिटात प्रवासी कारवारला पोचू शकतात. या मार्गावरील वाहतूक देखील मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. मात्र बाळळी ते व्हाया करमल घाट ते गुळे पर्यंतच्या रस्त्याचे अद्याप रूंदीकरण न झाल्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याच्या घटना आता वाढायला लागल्या आहेत. 12 रोजी झालेल्या या अपघातात कोणतीच मनुष्यहानी झालेली नसल्याची माहिती काणकोणच्या पोलिसांनी दिली.