मालवणी अभिनेत्रीrची कर्करोगाशी झुंज
लॉकडाऊनमुळे लवराज कांबळी कुटुंब आर्थिक संकटात
कॅन्सरपीडित पत्नी गीतांजलीच्या मदतीसाठी हाक
तेजस देसाई / दोडामार्ग:
एका कलाकाराची व्यथा सांगत रसिकांच्या मनावर अधिराज्य करीत असताना नाटय़प्रयोग पाहताना डोळय़ांच्या पापण्या ओल्या होतात व वास्तव भान डोळय़ांसमोर उभे राहते, तो नाटय़प्रयोग म्हणजे नटसम्राट. सही रे सही व अनेक मालवणी नाटकांमध्ये भूमिका साकारलेल्या सौ. गीतांजली लवराज कांबळी या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने पुन्हा एकदा ग्रासल्या आहेत. त्यानिमित्ताने या कलाकार कुटुंबाची व्यथा समोर आली आहे. नटसम्राटमधील ‘टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे’ याप्रमाणे गीतांजली कांबळींची स्थिती झाली आहे. विधात्या, तू इतका कठोर का झालास….या विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही कोणाच्या पायावर डोके तरी ठेवायचे, असे विचारायची वेळ आली आहे.
मालवणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱया या कांबळी कुटुंबाच्या मदतीसाठी कोकणातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि नाटकावर प्रेम करणारे रसिक मायबाप पुढे यायला हवेत. अन्यथा नाटका केली की आयुष्याची नाटका होतत. सगळी सोंगा घेवक येतत, पैशाचा नाय, हे पुन्हा एकदा समोर येईल. त्यामुळे या कुटुंबाला नटसम्राटमधील नाटकाच्या संवादात सांगायचे झाल्यास, सूर म्हणतो साथ दे.. दिवा म्हणतो वात दे… उन्हामधल्या म्हाताऱयाला फक्त तुझा हात दे.. याप्रमाणे या कांबळी कुटुंबाला रसिकांच्या मदतीचा हात पुढे आलाच पाहिजे.
अभिनेत्री गीतांजली कांबळी यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने पुन्हा एकदा ग्रासले आहे. त्यांच्यावर मुंबई चर्निरोड येथील सेफी हॉस्पिटल येथे डॉक्टर अनिल संगरिया हे उपचार करीत आहेत. कोरोनामुळे शूटिंग बंद आहेत, तर नाटय़ व्यवसायही ठप्प आहे. त्यामुळे छोटय़ा कलाकारांवर आर्थिक संकट आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच गीतांजली कांबळी याचा दुर्धर आजार महागडा असल्याने पैशांची जमवा जमव कशी करायची, ही समस्या कांबळी कुटुंबाला सतावत आहे.
पन्नासहून अधिक नाटके
‘सही रे सही’ या नाटकात अभिनेते भरत जाधव बरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षक विसरले नाहीत. झी चॅनेलची ‘कुंकू’ मालिकाही गाजली. त्यांनी बकुळा नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला व गलगले निघाले, या सिनेमामध्ये काम केले. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका दाद देऊन गेली. गीतांजली यांनी 50 पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर गीतांजली कांबळी यांचे पती लवराज कांबळी यांच्या नाटकांमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. गीतांजली यांच्या जीवनावर नाटक ‘बायको खंबीर, नवरो गंभीर’ या मालवणी नाटकाची निर्मितीही लवराज यांनी केली आहे. लवराज यांनी मालवणी वस्त्रहरण नाटकात गोप्याची भूमिका मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्यासमवेत केली आहे. गीतांजली यांनी 2012 मध्ये कॅन्सरवर मात करीत अनेक नाटके, सिनेमा व मालिकांमधून आपल्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत 40 केमो झाले आहेत. परंतु पुन्हा एकदा त्यांना याच आजाराने ग्रासले आहे. या आजारातून बाहेर येण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे.
मदतीचे आवाहन
मालवणी भाषा सातासमुद्रापार नेणाऱया या कांबळी कुटुंबाची व्यथा भयानक आहे. त्यांच्या आयुष्याची जमा पुंजी केवळ रसिकांचे प्रेम आहे. त्यामुळे प्रेमाची मदत खालील खाते नं. मध्ये जमा करणे आवश्यक आहे. जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड मुंबई मुलुंड ईस्ट. खातेदार, लवराज कांबळी / कामाक्षी कांबळी. खाते नंबर 015010100013089. संपर्क क्रमांक लवराज कांबळी-9224227666.