अधिकाऱयांच्या सतर्कतेमुळे ‘पठाणी डाव’ उधळून लावला
प्रतिनिधी/ गोडोली
फसवणुकीत हातखंडा असलेल्या येथील अजिम पठाण याने एका फायनान्स कंपनीकडून स्कोडा गाडीसाठी कर्ज घेऊन बनावट कागदपत्रे तयार करून कर्जाचा बोजा कमी करून गाडी विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अधिकाऱयांच्या सर्तकतेमुळे अजिम पठाण यांचा हा डाव फसला आहे. कंपनीसोबत वनटाईम सटेलमेंट केल्याचा कांगावा करणाऱया आणि आधीच गुन्हेगारीने मोका कायद्याच्या दारात असलेल्या अजिम सलीम पठाण हा आता फसवणुकीच्या नव्या प्रकरणात फायनान्स कंपनी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कचाटय़ात सापडला आहे. याबाबत ‘तरुण भारत’शी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
चैनीचे आयुष्य जगण्यात मश्गुल असलेल्या अजिम पठाण व त्याच्या पुत्राचा नवीन कारनामा समोर आला आहे. कर्जास पात्र नसल्याची पार्श्वभूमी असतानासुध्दा तब्बल साडेपाच लाखाचे एका फायनान्स कंपनीकडून दि. 15 डिसेंबर 19 मध्ये कर्ज घेऊन अलिशान स्कोडा गाडी घेतली. एकही हप्ता न भरता ऑगस्ट 2020 मध्ये थेट कर्जाचा बोजा कमी केल्याची बनावट कागदपत्रे उपप्रादेशिक कार्यालयात दाखल केली. याची फायनान्स कंपनीच्या सोलापूरच्या एजंटला त्यांच्या संपर्कातील एकाने टिप दिली. तत्काळ त्या एजंटने वकिलांच्या सोबत सातारचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गाठले.
उपप्रादेशिक कार्यालयात वरिष्ठांना भेटून त्या सोलापूरकर एजंटने आपली बाजू क्लिअर करताना तब्बल 6 लाख 64 हजार 662 रक्कमेचा थकबाकीदार असलेल्या पठाण पुत्राने गाडीवर कर्ज असताना बनावट एनओसी, बनावट शिक्के, खोटय़ा सहय़ा करून ती खरी असल्याचे भासवत एम. एच. 09 इ. के. 5191 या गाडीवरील फायनान्स कंपनीचा बोजा कागदोपत्री कमी केला असल्याची पुराव्यांची कागदपत्रे उपप्रादेशिक कार्यालयात दाखल केली.
बनावट शिक्के, बोजा कमी केलेले कंपनीचे पत्र, खोटय़ा सहय़ा करून अन्य कागदपत्रे तयार करण्यासाठी ज्यांनी मदत केली. त्यांना या पठाण पुत्राने अडचणीत आणले. याबाबत सोलापूरकरांच्या वकिलांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सदर प्रकरणात फायनान्स कंपनीला फसविण्याच्या डावात पठाण पुत्राबरोबर कर्जाला जामीनदार असलेले त्याचे वडील, मित्रासह त्याला बनावट कामासाठी सहकार्य करणाऱया सर्व हस्तकांना कायद्याच्या कचाटय़ात अडकविणार असल्याचे सांगितले.
मुळच्या रहिमतपूर येथील बाजारपेठेतील त्या पठाण पुत्राने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अभिनय करत मी 23 हजार रूपये एक हप्ता भरला आणि वन टाईम सेटेलमेंटसाठी 3 लाख 50 हजार रूपये कंपनीच्या सोलापूरकर एजंटने ऑफर दिल्याने ते ही पैसे दिले आहेत. त्याच्या पावत्या असल्याचे अधिकाऱयांना खोटे रेटून सांगत माझीच फसवणूक झाल्याच्या कांगावा केला आहे. आता बनावट कागदपत्रे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ताब्यात असून फायनान्स कंपनी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून लवकरच पोलिसांत पठाण पुत्रावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सातारा, रहिमतपूर परिसरात वास्तव्य करणाऱया अजिम सलीम पठाण याचे अपघात, फसवणूकसह अनेक गुन्हेगारी कारनामे आधीच पोलिसांच्या रडारवर असून आता नव्या कारनाम्यात अनेक जणांना त्याने अडकविल्याने सारेजण गॅसवर आहेत.
अधिकारी आणि एजंटांची मिलीभगत
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दारात अनेकजण बनावट कागदपत्रे करण्यात माहिर आहेत. एजंट मंडळी स्वतःच कार्यालयातील कपाटे उघडून कागदपत्रांची पाहणी करत बनावट कामांचे पुरावे ठेवत नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळते. अधिकारी पैशाच्या हव्यासाने आंधळे झाले असून त्यांचीच नियमांना बगल देत बनावट कामांना या एजंट मंडळींना साथ असल्याने बोलले जाते. अशा कामांतून अधिकारी आणि एजंटांनी मिलीभगत करून गच्चम कमाई केल्याचे याच कार्यालय परिसरात उघड बोलले जाते. एखादे प्रकरण उघडकीस आले तर ते कायदेशीर कारवाईच्या टप्प्यापर्यंत पोहचू दिले जात नाही. काही निरिक्षक मंडळी जिथे पैसे जास्त मिळतात तिथे डय़ुटीसाठी कार्यालयात वरचेवर एकमेकांशी चक्क भांडत असल्याचे अनेकवेळा आवाज ऐकू येतात.
पुन्हा अलिबाबाची गुहा
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आत-बाहेर सुरू असलेल्या नियमबाहय़, बनावट कामांचा पंचनामा करणारे ‘तरुण भारत’ने अलिबाबाची गुहा हे सदर लावले होते. यात एजंट ते अधिकारी यांच्यातील उघडसत्य असलेल्या अनेक गोष्टीं चव्हाटय़ावर आणल्या होत्या. आता पूर्वीपेक्षा अधिक प्रकार राजरोस सुरू असून त्याबाबत नव्या ढंगात अलिबाबाची गुहा हे सदर ‘तरुण भारत’मध्ये क्रमशः सुरू होणार आहे.
कायदेशीर कारवाई होणार
दुगार फायनान्सकडून कर्ज घेवून अजिम पठाण याने गाडी घेतली. सदर गाडीचे कर्ज अद्यापही असून याबाबत चेन्नई येथील कार्यालयातून खातरजमा घेतली आहे. बनावट कागदपत्रे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा असून सदर प्रकरणी चौकशी सुरु असून योग्यवेळी कायदेशीर कारवाई केली जाईल.
– संजय राऊत,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी