प्रतिनिधी/ सातारा
देशसेवा करत असताना आंतकवाद्यांच्या हल्यात हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभे करण्याकरता पालिकेला विलंब होत असल्याने माजी सैनिक संघटनेचे शंकर माळवदे यांनी पालकमंत्र्यांनाच काळे झेंडे दाखवण्याचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचे ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिका प्रशासनानेही त्याची दखल घेवून नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये तातडीने बैठक घेतली. याबैठकीत साविआचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता बनकर यांनी चांगलाच अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्यावर जाळ काढला. लगेच स्मारकासाठी जागेची पाहणी केली. तसेच आंदोलन मागे घ्या, अशा विनवणीचे पत्रच माळवदे यांना देण्यात आले.
सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱयाची ओळख आहे. त्याच सातारा तालुक्यातील पोगरवाडीचे कर्नल संतोष महाडिक यांचे आणि सातारा शहराचे जवळचे नाते होते. त्यांना देशसेवा करताना हुतात्म आले. त्याचवेळी साताऱयात त्यांचे स्मारक बांधण्याचा विचार पुढे आला. पालिकेनेही त्यावेळी चर्चा करुन ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र जागेचा सगळाच बटय़ाबोळ झाला. त्यामुळे रेंगाळत चाललेल्या या स्मारकाच्या प्रश्नावरुन माजी सैनिक शंकरराव माळवदे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यांनी निवेदन दिले. ‘तरुण भारत’नेही वृत्त प्रसिद्ध करताच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी तातडीने बैठक बोलवली. सकाळी बैठक होताच त्या बैठकीत माळवदे यांनी खंत व्यक्त केली. त्यावरुन नगरसेवक दत्तात्रय बनकर यांनी प्रखरपणे अभियंता भाऊसाहेब पाटील यांना चांगलेच खडे बोल सुनावले. हे काम मार्गी लागले पाहिजे याकरता काय करणार ते सांगा, असे सांगून आजच पाहणी करा अशा सुचना दिल्या.
त्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनीही प्रशासनाला तुम्ही काय करणार आहात त्याचेही पत्र माळवदेंना द्या. लेखी पत्र माळवदेंना देण्यात आल्याने त्यांनीही तुर्तास आंदोलन स्थगित केले असले तरीही हुतात्मा संतोष महाडिक यांच्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही तर संघटनेला विचारुन आंदोलन करणार असा इशारा दिला. त्यावर बैठक झाल्यानंतर लगेच आर्युवेदिक गार्डनमध्ये जावून जागेची पाहणी केली. त्या पाहणीवेळी अभिंयता भाऊसाहेब पाटील, आर्किटेक्ट पाटील यांच्यासह मान्यवर होते. या पाहणीचा अहवाल तयार करुन बुधवारी त्याचे प्रझेंटेशन सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.