बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य सरकारनेही कोरोना लसीकरणाची संख्याही वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. राज्यात सुरु असणाऱ्या सध्याच्या लसीकरणाच्या दुप्पट लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहे. दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक ज्येष्ठांनी पहिल्या डोसच्या अवघ्या चार आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस घेण्यास गर्दी केली आहे, जरी केंद्र सरकारने २२ मार्च रोजी सर्व राज्यांना डोस दरम्यानचे अंतर वाढवण्याचा सल्ला दिला होता. केंद्राने सर्व राज्यांना पहिल्या डोस नंतर दुसरा डोस ६-८ आठवड्यानंतर घेण्यास सांगितले होते.
राज्यात कोरोनाचा वेग वाढल्याने दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात वाढती कोरोनाची संख्या चिंताजनक बनली आहे. एप्रिलच्या १ ल्या तारखेपासून राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तसेच राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तरीही नागरिक खबरदारी न घेता घराबाहेर पडत आहेत. नागरिकांनी घराबाहेर न पडत घरी राहून काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे राज्य सरकार सांगत आहे. परंतु लसीकरण करण्याकडे नागरिक कानाडोळा करत आहेत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या भीतीने पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस घेण्यासाठी गर्दी करताना पहायला मिळत आहेत.