बेंगळूर/प्रतिनिधी
थावरचंद गहलोत रविवारी कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतील, अशी माहिती कर्नाटक राजभवनाने दिली आहे. ११ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हा शपथविधी कार्यक्रम राज भवनच्या ग्लास हाऊसमध्ये होणार आहे. त्यावेळी “कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक या निमित्ताने नवीन राज्यपालांना कार्यालय व गोपनीयतेची जबाबदारी सोपवतील.”
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी राष्ट्रपती कार्यालयाकडून कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश सह ६ राज्यांच्या नव्या राज्यपालांची यादी जाहीर करत यामध्ये थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. थावरचंद गहलोत हे मोदींच्या पहिल्या मंत्रीमंडळात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री होते. पण मोदींनी थावरचंद गहलोत यांच्यासह १२ जणांचे राजीनामे घेत त्यांच्या ठिकाणी नव्या व्यक्तीला संधी दिली.