वीस दिवसांपासून कोळसा हाताळणी थंडावली
प्रतिनिधी / वास्को
कर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा फटका मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीला बसला आहे. मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी सध्या ठप्प झालेली असून कर्नाटककडे जाणारी कोळसा वाहतूक थंडावल्याने एमपीटीसह, जिंदाल कंपनी व बंदरातील संबंधित कंपन्यांचीही कोंडी झालेली आहे. त्यांना दिवसा लाखोंचा फटकाही बसत आहे. गेल्या वीस दिवसांपासून मुरगाव बंदरात ही परिस्थिती आहे.
कर्नाटक राज्यात आतापर्यंत 59652 कोरोनाबाधित आढळून आलेले असून 1240 जणांचा या संसर्गाने बळी घेतलेला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये सध्या अस्वस्थता पसरलेली आहे. तेथील औद्योगिक क्षेत्रावरही कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम झालेला आहे व कर्नाटकमधील औद्योगिक क्षेत्रावरचा परिणाम सध्या मुरगाव बंदरालाही सहन करावा लागत आहे. कर्नाटकच्या हॉस्पेटमध्येही कोरोना संसर्गाने उच्छाद केलेला आहे. या हॉस्पेटमध्ये जिंदाल कंपनीचा कोळसा हाताळणी प्रकल्प असून या प्रकल्पात जवळपास पंधरा हजार लोक काम करतात. या कामगारवर्गामध्ये कोरोनाबाधितांची संख्याही मोठी असल्याने या उद्योगाच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. प्रसार रोखण्यासाठी या कामापासून हजारो कामगारांना दूर राहावे लागलेले आहे. त्यामुळे हाताळणी थंडावलेली आहे. हॉस्पेटमधील या परिस्थितीचा थेट परिणाम मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीवर झालेला आहे.
हॉस्पेटमधील परिस्थिती सुधारल्यावरच सुधारणा
मुरगाव बंदरात कोळसा मोठय़ा प्रमाणात पडून आहे. हॉस्पेट बेल्लारीपर्यंत त्याची होणारी वाहतूक सध्या थंडावलेली आहे. एमपीटीमधील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरगाव बंदरातून रोज कोळसावाहू नऊ रेल्वे रॅक्स हॉस्पेटकडे जात होते. सध्या केवळ तीनच मालवाहू गाडय़ा मुरगाव बंदरातून सुटतात. त्यामुळे पडून राहिलेल्या कोळशामुळे बंदरात अतिरिक्त कोळसा हाताळणी अडकून पडली आहे. गेल्या वीस दिवसांपासून मुरगाव बंदरात हीच परिस्थिती असून हॉस्पेटमधील परिस्थिती सुधारल्याशिवाय मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी वाढणार नाही. याचा फटका जिंदाल कंपनीसह एमपीटी आणि बंदरातील संबंधित खासगी आस्थापनांनाही बसला आहे.
तीन महिन्यांत 18 लाख टन लोह खनिज हाताळणी
दरम्यान, गेले काही वर्षी खाणबंदीची झळ बसलेल्या मुरगाव बंदरात गेल्या तीन महिन्यात चांगली खनिज हाताळणी झाली आहे. एमपीटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल, मे आणि जून महिन्यात आतापर्यंत 18 लाख टन लोह खनिज हाताळणी झालेली असून पंचवीस जहाजांतून खनिजाची निर्यात झालेली आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत एमपीटी व खनिज निर्यातदारांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.