माजाळी चेकनाक्यावर आरंभी 200 जणांना मज्जाव करण्याचा प्रकार
प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेल्या आणि कर्नाटक राज्यातील हरित विभागांतील मूळ निवासी असलेल्या कामगारांची व अन्य नागरिकांची अजूनही पोळे चेकनाक्यावर गर्दी चालूच आहे. 14 रोजी जवळजवळ 200 नागरिकांना सुरुवातीला कर्नाटकच्या माजाळी चेकनाक्यावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या नागरिकांवर परत फिरण्याची पाळी आली. मात्र नंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.
गोव्यात नुकतेच कोरोनाचे 7 नवीन रुग्ण आढळले असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून गोव्यात अडकून पडलेल्या नागरिकांना कर्नाटकात घ्यायला आधी मज्जाव करण्यात आला. मात्र गोव्यात आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी काही मुंबईतून आलेले असल्याचे व काही गुजरात राज्यातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रवेश नाकारलेल्या कर्नाटकातील शिर्सी, हावेरी येथील कामगारांना व अन्य नागरिकांना प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी पोळे चेकनाक्यावर त्यांचे सर्व सोपस्कार करण्यात आल्याची माहिती संबंधितांनी दिली.
तालुका निरीक्षकांकडून तातडीने बैठक
गोव्यात अडकून पडलेल्या आणखी कामगारांनी आपल्या गावी परतण्याची इच्छा व्यक्त करून काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी चालूच ठेवली आहे. लॉकडाऊनच्या काळात काणकोण तालुक्यात सोशल डिस्टन्सिंग न ठेवता काही ठिकाणचे व्यवहार चालू असल्याच्या वृत्तानंतर काणकोण तालुक्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱया दीपक देसाई यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, मामलेदार विमोद दलाल, पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण आणि अन्य अधिकाऱयांची तातडीची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या. लॉकडाऊनच्या काळात सरकारी यंत्रणा, पोलीस आपआपल्या परीने काम करत आहेत. पोळे चेकनाक्यावर देखील 24 तास कडक तपासणी आणि पहारा चालू आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
परिस्थिती नियंत्रणात, माजी नगराध्यक्षांकडून कौतुक
दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काणकोण तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल काणकोणच्या माजी नगराध्यक्षा प्रार्थना गावकर यांनी उपजिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकारी या दोन्ही जबाबदाऱया सांभाळणाऱया प्रीतिदास गावकर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. काणकोण हा कर्नाटकला भिडलेल्या सीमेवरील भाग आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या तालुक्यात पर्यटकांची तसेच अन्य राज्यांतून येणाऱया नागरिकांची सतत वर्दळ असते. जनता कर्फ्यू जाहीर होण्याअगोदर 15 मार्च रोजी जाहीर केलेली शासकीय शिमगोत्सव मिरवणूक रद्द करून काणकोण शिमगोत्सव समितीने एक अत्यंत चांगले पाऊल उचलले होते, याकडे गावकर यांनी लक्ष वेधले. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत स्थानिक सर्वसामान्य नागरिकांबरोबरच काम-धंद्यानिमित्त या ठिकाणी आलेल्या परराज्यांतील कामगारांची खूपच गैरसोय झाली. अशावेळी स्वयंसेवकाची फळी उभारून परराज्यांतील जवळजवळ 1200 कामगारांना शिधा पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम या तालुक्यात घडले. सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवहार करावेत अशा वारंवार सूचना करून देखील काही जण ऐकत नाहीत असे दिसून आल्यावर अशा वेळी कडक भूमिका घेण्याचे काम या अधिकाऱयांना करावे लागले. तालुका निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले दीपक देसाई आणि पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनीही लॉकडाऊनच्या काळात परिस्थिती नियंत्रणखाली ठेवण्यासाठी चांगले काम केलेले आहे, असे गावकर यांनी म्हटले आहे.