आतापर्यंत 36 विमानांतून 7 हजाराहून अधिक पर्यटक मायदेशी
प्रतिनिधी / वास्को
गोव्यात अडकलेल्या 426 रशियन पर्यटकांनी शुक्रवारी संध्याकाळी मायदेशी प्रयाण केले. गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांची देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खास विमांनांव्दारे परत पाठवणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 36 विमानांतून 7 हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांना गोव्यातून त्यांच्या देशात पाठवण्यात आलेले आहे.
गुरूवारी दुपारी रशियातून हे विमान विनाप्रवासी गोव्यात आले होते. संध्याकाळी 426 पर्यटकांसह या विमानांने पुन्हा रशियाकडे प्रयाण केले. गोव्यात अजूनही अडकलेले विदेशी पर्यटक असून ते आपल्या हवाई जहाजांच्या प्रतिक्षेत आहेत. मे अखेरपर्यंत गोव्यातील सर्व विदेशी पर्यटकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळ सुत्रांकडून मिळाली.
त्या 31 भारतीय नागरिकांचे आगमन झालेच नाही
दाबोळी विमानतळावर रशियाहून येणाऱया एका विमानातून विदेशात अडकलेले 31 भारतीय नागरिक गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दाखल होतील असे वृत्त गुरूवारी सकाळपासून पसरले होते. मात्र, ते वृत्त अखेर खोटेच ठरले.
दाबोळी विमानतळावर गुरूवारी दुपारी रशियाहून एक विमान आले. ते विमान खास रशियन पर्यटकांसाठी घेऊन जाण्यासाठी रिकामेच आले होते. त्या विमानातून कोणीही भारतीय नागरिक उतरला नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने केलेली पूर्व तयारी वाया गेली. विदेशातून भारतीय नागरिक दाबोळी विमानतळावर उतरतील अशी कोणतीही अधिकृत माहिती कुणापर्यंतही पोहोचली नव्हती. मात्र, तसे वृत पसरल्याने अखेर त्या विमानाचे आगमन होण्याच्या काही तास आधीच दाबोळी विमानतळावर खबरदारी म्हणून पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही पूर्ण खबरदारी घेतली होती. एवढेच नव्हे तर आरोग्य विभागाचे डॉक्टर व इतर आवश्यक कर्मचारीही तपासणीसाठी सर्व सुविधांसह विमानतळावर हजर झाले. स्थानिक जबाबदार शासकीय अधिकाऱयांनीही विमानतळावर काही तास खर्ची घातले. मात्र, शेवटी त्या विमानातून एकही भारतीय उतरला नसल्याचे स्पष्ट होताच, त्यांना माघारी परतावे लागले. त्यामुळे कोविड युध्दांचे पूर्ण कष्ट या घटनेत वाया गेले.