बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी रुग्णालयांविषयी तक्रारी येत आहेत. यातच खासगी रुग्णालयांच्या असंवेदनशील व असहयोगात्मक वृत्तीमुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शुक्रवारी लोकप्रतिनिधी आणि बृह बेंगळूर महानगरपालिकेच्या दक्षिण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृष्णा निवासस्थानी बैठक घेतली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. अनेक तक्रारी अशा आल्यात की बऱ्याच रुग्णालयांनी नियमानुसार कोरोनावर वैद्यकीय उपचारासाठी ५० टक्के बेडपुरवलेले नाहीत. त्यामुळे या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. खासगी वैद्यकीय महाविद्यालये व खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनासह आतापर्यंत चार बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक वेळी बेड वाटपावर सहमती दर्शविल्यानंतरही बेड का दिले जात नाहीत.
वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांकडून मनमानी बिले का आकारली जातात. राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या अशा खासगी वैद्यकीय महाविद्यालये व खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास सहकार्य न करणार्या संस्थांवर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. असे मुख्यमंत्रांनी म्हंटले आहे.