दोन्ही राज्यात बस सेवा सुरु होणार
प्रतिनिधी / मिरज
महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह अहवाल सक्ती दि. २५ आक्टोबर रोजी सोमवारपासून बेळगाव जिल्हाधिकार्यांनी स्थगित केली आहे. यामुळे गेले दोन महिने बंद असलेली महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा पुन्हा सुरु होणार आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने कर्नाटकात प्रवेशासाठी प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवालाची सक्ती केली होती. कर्नाटक हद्दीत प्रवेश नाकारण्यात येत असल्याने दोन्ही राज्यातील बस सेवा सीमेपर्यंतच सुरु होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू होते. विशेष करून वैद्यकीय क्षेत्राला त्याचा फटका बसला होता. कामानिमित्त कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्रीय प्रवाशांचीहि गैरसोय होत होती.
सीमाभागातील नागरिक व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे कोरोना अहवाल सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने व सीमाभागातील नागरिक व्यापार व व्यवसायासाठी परस्परांवर अवलंबून असल्याने कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह तपासणी अहवालाची सक्ती सोमवार दि.२५ पासून स्थगित केल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जाहिर केले आहे. निर्बंध हटविल्याने मिरज आगारातून नियमित कर्नाटकात जाणार्या फेर्या सुरु होणार आहेत.