समस्या ऐकण्यासाठी गुरुवार राखीव
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील भाजप आमदारांच्या समस्या ऐकण्यासाठी आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवला आहे. या दिवशी ते आमदारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढणार आहेत.
मुख्यमंत्री दर आठवड्याला गुरुवारी भाजपच्या आमदारांना भेटतील, असे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी सोमवारी रात्री बेंगळूरमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आमदारांसोबतच्या साप्ताहिक बैठका सरकार आणि पक्षाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या उपक्रमांच्या मालिकेचा हा भाग असणार आहे.
भाजपच्या मंत्र्यांनीही अलीकडच्या काही दिवसांत कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयाला भेट देणे सुरू केले आहे. शिक्षण मंत्री बी. सी. नागेश आणि कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बेंगळूर येथील पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतली.