बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, थावरचंद गहलोत यांच्या कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्तीचे स्वागत करताना मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि सामाजिक न्यायासाठी बांधीलकीचा राज्याला फायदा होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी 8 राज्यात नवीन राज्यपाल नेमले आहेत.
“कर्नाटकचे नवीन राज्यपाल म्हणून मी थावरचंद गहलोत यांचे मनापासून स्वागत करतो. गहलोतजींच्या सार्वजनिक जीवनातल्या दीर्घ अनुभवाचा आणि सामाजिक न्यायासाठी बांधिलकीचा राज्याला फायदा होईल. तसेच कर्नाटकातील योगदानाबद्दल राज्यपालवजुभाई वाला जी यांचे मी आभार मानतो, ” असे येडीयुरप्पा यांनी ट्विट केले. सध्या ते केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गहलोत यांचे अभिनंदन करताना सांगितले की, ” त्यांना नव्या भूमिकेत यश मिळावे अशी इच्छा आहे आणि घटनात्मक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे आणि ते करतील अशी आशा आहे.”