5 जणांचा मृत्यू, 73 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनलॉक जाहीर करण्यात आले. त्यानंतरही रुग्णसंख्या काहीप्रमाणात कमी असल्याचे सध्या तरी दिसत आहे. मंगळवारी जिल्हय़ामध्ये 157 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मंगळवारी 73 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या 1860 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी अजूनही कोरोना गेलेला नाही. तेव्हा कोरोनाचे नियम पाळणे हे गरजेचे आहे. मात्र, अनलॉकनंतर जनतेने या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बाजारपेठेमध्ये तर खरेदीसाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे आणखी रुग्ण वाढतील काय? अशी भीती व्यक्त होत आहे. गेल्या 15 दिवसात रुग्णसंख्या कमी झाली ही बाब दिलासादायक आहे. जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 76,404 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामधील 73,742 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 802 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना कमी झाला तरी ब्लॅक फंगस रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामुळे भीती व्यक्त होत आहे. एकूणच अनलॉक झाला तरी जनतेने सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
मंगळवारी बेळगाव तालुक्यामध्ये 43 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये शहर व उपनगरांमधील 37 तर ग्रामीण भागातील 6 जणांचा समावेश आहे. शहरातील आंबेडकरनगर, अनगोळ, अंजनेयनगर, भाग्यनगर, भारतनगर शहापूर, कुडची, लक्ष्मीटेक, मजगाव, मारुती गल्ली बेळगाव, आर. सी. नगर बेळगाव, वीरभद्रनगर या परिसरात रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागातील गौंडवाड, कंग्राळी के. एच., कंग्राळी बी. के., कुद्रेमनी, शिवापूर या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.