बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आल्याने रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे, विशेषत: राज्यभरातील कोविड -१९ रूग्णांवर खासगी आणि सरकारी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. बऱ्याच रुग्णांना रेमडेसिवीर द्यावं लागत आहे. बऱ्याच वेळेला रेमडेसिवीर उपलब्ध होत नसल्याने वाढीव किमतीने खरेदी केली जावी लागत आहे. अशा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली ९० जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.
राज्याचे डीजी व आयजीपी प्रवीण सूद यांनी सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा बनावट रेमडेसिवीर पॅकिंग केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ३८ प्रकरणात ९० जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. या कठीण परिस्थितीत नफा मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांविरूद्ध आमची कारवाईची मोहीम सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बेंगळूरचे डीसीपी (उत्तर) धर्मेंद्र कुमार मीना यांनी “आम्ही रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करण्याऱ्या स्त्रोतापर्यंत पोहोचू आणि जो सामील आहे त्याच्याविरूद्ध कारवाई करू. पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली कोणतीही माहिती देण्यासाठी संपर्क साधावा अशी विनंती आहे. आम्ही गोपनीयता बाळगत वेगवान कारवाई करू.” असे आश्वासन दिले आहे.