बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन उपलब्धतेचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. ज्याला सर्वात जास्त आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत ते पोचविण्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डीसी, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एसपी आणि जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना लक्षणे असलेल्यांनाची चाचणी मर्यादित ठेवण्यास सांगितले आणि आरटी-पीसीआर चाचणी अहवाल २४ तासात देण्यास सांगितले.
ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरचा योग्य वापर करा
“सर्व रुग्णालयांना वेळीच ऑक्सिजन मिळेल याची खबरदारी घ्यावी,” असेही ते म्हणाले. तसेच तातडीने ऑक्सिजनची आवश्यकता निर्माण झाल्यास शेजारच्या जिल्ह्यांना सहकार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातील कोविड -१९ पीडितांवर उपचार करण्यासाठी पुरेशी बेडची व्यवस्था न केल्याबद्दल अनेक उपायुक्तांना झापले. “अनेक उपायुक्तांनी बेडांची योग्य व्यवस्था केलेली नाही. कोविड केअर सेंटरसुद्धा खुले नाहीत,” असे ते म्हणाले. सर्व तालुक्यात कोविड केअर सेंटर तयार ठेवावेत याची काळजी घ्या, असे ते म्हणाले. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरचा योग्य वापर करा असेही ते म्हणाले.
राज्यात १४ दिवसांच्या ‘क्लोज डाऊन’ दरम्यान नागरीकाकांनी बेंगळुरहून पलायन केल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ होण्याच्या भीतीने येडियुरप्पा यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना राज्यातील कोविड महामारीची दुसरी लाट नियंत्रित ठेवण्यासाठी राज्याच्या राजधानीतून परत येणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.