मार्च 2022 पर्यंत लसीकरणाच्या दोन डोसचा खर्च करणार – मेडिकल इन्शुरन्सही दिला जाणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज वाहन कंपनी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आपल्या सर्व विक्रेत्यांच्या कर्मचाऱयांचे लसीकरण करणार असून त्यांचा खर्च स्वतः कंपनी उचलणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 पर्यंत डिलरशिपमधील प्रत्येक कर्मचाऱयाच्या लसीकरणाचा दोन्ही डोसचा खर्च महिंद्रा ऍण्ड महिंद्रा उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याकरीता प्रतिव्यक्ती 1500 रुपये रिइम्बर्स (भरपाई) करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
यासोबतच कंपनीने डिलरशीपमधील कर्मचाऱयांचे कोरोना उपचारासाठी एक लाख रुपयाचा एक वर्षाचा वैद्यकीय विमा उतरवण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे कोणत्याही कर्मचाऱयाचे निधन झाल्यास त्याच्या परिवाराला 2.5 लाख रुपयाची मदत देणार असल्याचीही घोषणा कंपनीने केली आहे.
टेक महिंद्रामध्ये लसीकरण
या अगोदर टेक महिंद्राने आपल्या सर्व कर्मचाऱयांचे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यात आले आहे. प्रारंभीच्या काळात दिल्ली एनसीआरमध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे. याकरीता कंपनीने फोर्टिस हेल्थकेअरसोबत हातमिळवणी केली आहे.