वार्ताहर / केपे
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन असल्याने फक्त शहरी भागांना किंवा बिगरगोमंतकीय कामगारांनाच याचा फटका बसला आहे असे नाही, तर ग्रामीण भागांतही याचा फटका बराच बसलेला आहे. याची जाणीव प्रशासनाला झाली असून त्यामुळे ग्रामीण भागांतील गरजू लोकांच्या मदतीला धाव घेऊन प्रशासन त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे.
शहरी भागांतील लोकांच्या मदतीला अनेक हात पुढे येतात. ग्रामीण भागांमध्ये मात्र कमीच लोक मदतीला येतात. त्यामुळे केपेच्या मामलेदारांनी आपल्या तलाठी व इतर कर्मचाऱयांच्या मदतीने ग्रामीण भागांतील गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना मदत पोहोचविण्याचे कार्य सुरू केलेले आहे. काही गावांमध्ये वृद्ध महिला एकटय़ाच राहतात. अशा लोकांना मामलेदारांतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे.
केपे तालुक्मयात समावेश होणाऱया कर्ला या गावात जाऊन 30 गावकऱयांना केपे मामलेदारांतर्फे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. केपे शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि कावरेपिर्ला पंचायतीत समावेश असलेला हा गाव अगदी डोंगरमाथ्यावर असून तेथे जायला हवे तसे साधनही नाही. मात्र प्रशासनाला तेथील स्थितीची माहिती मिळताच त्यांनी त्या गावात जाऊन मदत केली. यापैकी 22 कुटुंबे ही अनुसूचित जमातींतील, तर 8 कुटुंबे धनगर समाजातील आहेत. यावेळी केपेचे मामलेदार रमेश गावकर, तलाठी योगेश फळदेसाई व इतर उपस्थित होते.