वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने आठवे स्थान मिळविले आहे. त्याचे मानांकन सहा अंकानी वधारले आहे. त्याचप्रमाणे रविचंद्रन अश्विने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे तर अक्षर पटेलच्या मानांकनातही सुधारणा झाली आहे.
अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या तिसऱया कसोटीत भारताने 10 गडय़ांनी विजय मिळवून या मालिकेत आघाडी घेतली आहे. दिवस-रात्रीच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात रोहित शर्माने पहिल्या डावात 66 तर दुसऱया डावात नाबाद 25 धावा जमविल्या. या कामगिरीमुळे रोहित शर्माने 742.20 मानांकन गुणांसह आठवे स्थान मिळविले असून त्याने भारताच्या चेतेश्वर पुजाराला मानांकनात मागे टाकले आहे.
रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी अहमदाबादच्या कसोटीत दर्जेदार कामगिरी केली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने 11 बळी घेत सामनावीराचा पुरस्कार मिळविला. तसेच त्याने कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत 38 वे स्थान मिळविले आहे. अश्विनने अहमदाबाद कसोटीत 7 गडी बाद केले. या कामगिरीमुळे त्याने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. यापूर्वी अश्विन सातव्या स्थानावर होता. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लिचने पहिल्यांदा या मानांकन यादीत पहिल्या 30 गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले असून तो सध्या 28 व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार रूट याने या मानांकन यादीत 72 वे स्थान मिळविले आहे. अहमदाबादच्या कसोटीत कर्णधार रूटने पहिल्यांदाच एका डावात 5 गडी बाद केले होते. आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूच्या यादीत रूट संयुक्त 13 व्या स्थानावर आहे.