प्रतिनिधी /पणजी
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या युती झालेल्या दोन्ही पक्षातील सर्व उमेदवारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हजेरीत पक्षासोबत एकसंघ, एकनिष्ठ रहाण्याची तसेच पक्षांतर न करण्याची शपथ घेतली आणि तसे प्रतिज्ञापत्र स्टँप पेपरवर सादर केले. दोन्ही पक्षांचे नेते पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. गोवा इंटरनॅशनल सेंटर, दोनापावला येथे हा शपथग्रहण सोहळा झाला.
काँग्रेसचे 37 व गोवा फॉरवर्डचे 3 असे मिळून युतीचे सर्व 40 उमेदवारांनी त्यास हजेरी लावली. काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, सरचिटणीस के. वेणूगोपाळ, प्रभारी दिनेश गुंडुराव, खासदार फ्रान्सिस्क सार्दीन, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर हे त्यावेळी उपस्थित होते.
पाच वर्षांसाठी झाले शपथबद्ध
दिगंबर कामत यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना तर सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड उमेदवारांना कोकणी भाषेतून शपथ दिली. काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार तसेच 5 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षांतर करणार नाही. पुढील 5 वर्षात राजीनामा देणार नाही तसेच दुसऱया पक्षात जाणार नाही व निवडणूक लढवणार नाही. काँग्रेस पक्षाची धोरणे, कार्यक्रम, उपक्रम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार. कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असून पक्षाशी बांधील रहाणार असल्याची शपथ सर्वांनी घेतली.
शपथपत्रे पाठविणार सोनियांकडे
शपथग्रहण झाल्यावर सर्वांनी प्रतिज्ञापत्रे राहुल गांधी यांच्यामार्फत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. गांधी यांनी सर्व उमेदवारांशी ओळख करून घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली तसेच त्यांना विजयासाठी सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व त्या करीता तळा-गाळातील गावा-गावातील सर्व मतदारांकडे पोहोचावे, असे सूचित केले.
या कार्यक्रमानंतर गांधी यांनी पर्यटन, उद्योग व मच्छिमार, शॅक्समालक क्षेत्रातील प्रतिनिधींच्या गाठी-भेटी घेवून त्यांच्याशी चर्चा केली तसेच त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.