लुईझिन, रेजिनाल्ड, सार्दिन, खलपांवर नवी जबाबदारी : एल्विस, मार्था, संगीता परब, चोडणकर यांनाही पदे
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील काँग्रेस पक्षात धुसफूस सुरु होती. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गिरीश चोडणकर यांनाच प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहण्यासाठी हिरवा झेंडा दाखविल्याने अखेर काँग्रेस पक्षातील धुसफुशीवर पडदा पडला आहे. विरोधी पक्षनेतेपद मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडेच ठेवले असून कार्यकरी अध्यक्ष म्हणून माजीमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पदरी अपयश आल्यानंतर गिरीश चोडणकर यांना पक्षातील नेत्यांकडून घरचा अहेर मिळाला होता. चोडणकर यांनी नंतर राजीनामाही दिला होता. मात्र त्यावेळी चोडणकर यांचा राजीनामा हाय कमांडने स्विकारला नव्हता. चोडणकर हे हंगामी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत होते. मार्च 2022 मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन काँग्रेस हाय कमांडने राज्यातील विविध समित्या नव्याने जाहीर केल्या आहेत.
लुईझिन, रेजिनाल्डकडे जबाबदारी
अखिल भारतीय काँग्रेस समितीने जाहीर केलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये आमदार लुईझिन फालेरो यांची निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून तर संगिता परब यांची याच समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खलप, गोम्स जाहिरनामा समितीवर
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची वित्त समितीच्या अध्यक्षपदी तर डॉ. प्रमोद साळगावकर यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जाहीरनामा समिती अध्यक्षपदी ऍड. रमाकांत खलप आणि सह अध्यक्ष म्हणून एल्विस गोम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत चोडणकर यांची प्रसिध्दी समिती अध्यक्ष म्हणून तर मार्था साल्ढाणा यांची सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आलेक्स सिक्वेरा यांचे अभिनंदन
काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी गिरीश चोडणकर यांनी आलेक्स सिक्वेरा यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. येत्या विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे काम करून काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.
हाय कमांडने विश्वास ठेवल्याने धन्यवाद
आज गोव्याच्या जनतेला काँग्रेसचे नेतृत्व हवे असून जनता भाजपला कंटाळलेली आहे. हाय कमांडने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून माझे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवले असल्याने आपण धन्यवाद देत असल्याचेही चोडणकर म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी काँग्रेस हायकमांडने निश्चित केलेली प्रदेश समिती जाहीर केली.