दिवे बसविण्याकडे दुर्लक्ष : पथदीप बसविण्याच्या खर्चाची चौकशी करा
बेळगाव : काँग्रेस रोडचे काँक्रिटीकरण करून तीन वर्षे होत आली. पण अद्यापही नव्या डेकोरेटिव्ह पथदीप खांबांवर दिवे बसविण्यात आले नाहीत. येथील अनेक कामे पूर्ण केली आहेत. मात्र पथदीप बसविण्याचे काम अद्यापही रखडले आहे. दिव्यांविना सदर खांब शोभेचे बनल्याने खांबांवरील दिवे कुठे गायब झाले? अशी विचारणा होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दुभाजक निर्माण केले आहेत. तसेच डेकोरेटिव्ह पथदीप बसविले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रथम शिवबसवनगर व मंडोळी रोडच्या रस्त्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले होते. शहरात प्रथम हा रस्ता पूर्ण करून वाहतुकीस खुला केला होता. तसेच रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्याचे काम सुरू होते. रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे होत आली. तरी अद्याप डेकोरेटिव्ह खांबांवर दिवे बसविले नाहीत. गोगटे चौक ते तिसरे रेल्वेगेट दरम्यानच्या काँग्रेस रोडवर पथदिपांचे डेकोरेटिव्ह खांब बसवून आठ महिने उलटले. पण अद्यापही दिवे बसविले नाहीत. सध्या जुन्या दिव्यांच्या आधारेच पथदीप सुरू आहेत. पथदिपांअभावी ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरातील पथदीप सुरू करण्यात आले. पण काँग्रेस रोडवरील पथदीप बसविण्यासाठी स्मार्ट सिटीला मुहूर्त मिळाला नाही. केवळ डेकोरेटिव्ह खांबांची उभारणी करण्यात आली असून दिवे नसल्याने हे खांब शोभेचे बनले आहेत.
पथदीप खांब बसविण्यासाठी लाखोंचा निधी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत खर्ची घालण्यात आला आहे. पण दिव्यांअभावी हा निधी वाया गेल्याची टीका नागरिक करीत आहेत. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत असून पथदीप बसविण्यासाठी उभारलेले डेकोरेटिव्ह खांब शोभेचे बनले आहेत. या खांबांवर दिवे बसविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीला कधी मुहूर्त मिळणार? असा मुद्दा उपस्थित होत आहे.