स्थानिक विक्रेत्यांवर परिणामाचा दावा, मत्स्योद्योग संचालकांकडे तक्रार
प्रतिनिधी / काणकोण
कोविड-19 च्या महामारीनंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मासेविक्रीवर झालेला परिणाम आणि खवय्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मत्स्योद्योग खात्याने फिरत्या वाहनांतून मासेविक्री करण्यास परवानगी दिली. दक्षिण गोव्यात दोन वाहनांना ही परवानगी देण्यात आली आहे. त्यातील एक वाहन नावेली येथील असून सदर फिरत्या मासेविक्रीचा परिणाम स्थानिक मासळीविक्रेत्यांवर होत असल्याची लेखी तक्रार पोळे येथील आनंद नाईक यांनी मत्स्योद्योग खात्याच्या संचालकांकडे केली आहे.
यापूर्वी देखील काणकोण तालुक्यात मासेविक्री करण्याकरिता मत्स्योद्योग खात्याने ज्या वाहनाला परवानगी दिली होती त्याविरुद्ध चावडीवरील मासळीविक्रेत्यांनी तक्रार केल्यानंतर ही विक्री बंद करण्यात आली होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. चावडीवरील मासळे मार्केट बंद आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी बसून विक्रेत्या मासेविक्री करताना दिसतात. नावेली येथील वाहन काणकोण तालुक्यातील पालिका क्षेsत्रात मासेविक्री करत असल्याचा परिणाम दुसऱया वाहनावरही होत आहे, असा दावा नाईक यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, कोविड-19 च्या लॉकडाऊनमुळे कित्येक स्थानिक युवक या मासेविक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत. ही जमेची गोष्ट आहे. त्याचबरोबर नियंत्रण ठेवून आणि सोशल डिस्टन्सिंग राखून चावडीवरील मासळी मार्केट शक्यतो लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी पोळे येथील मत्स्य व्यावसायिक दीपक पागी यांनी केली आहे.