प्रतिनिधी / वास्को
चिखली ग्राम विकास समितीतर्फे ग्रामीण अर्थव्यवस्था पुनरूज्जीवन योजनेबाबतचा प्रस्ताव चिखलीचे कार्यवाहू सरपंच कमलाप्रसाद यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा प्रस्ताव ग्रामस्थांनी तयार केलेला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव्याने चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यानीच गोव्यातील पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना अशा योजनांचे प्रस्ताव सादर करण्याची सुचना केलेली आहे.
शिंपल्या, मोती यांच्यासह अन्य मत्स्य जीव उत्पादन, कुक्कुटपालन, सौर उर्जा निर्मिती, किचन गार्डनिंग, मध उत्पादन, पडीक शेतीचा वापर करणे अशा काही आर्थिक स्त्रोतांचा पर्याय चिखली ग्रामस्थांनी आपल्या प्रस्तावात मांडलेला आहे. चिखली गाव स्वावलंबी व नैसर्गिकरित्या विकसीत करण्याचे उद्धीष्ट आहे या पारंपरीक व आधुनिक आर्थिक योजनांतून होऊ शकतो असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कोविड 19 च्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ग्रामीण भागातून आर्थीक पुर्नरूज्जीवन योजना प्रस्तावित करण्यासाठी जनतेकडून व गावांकडून सुचना मागविल्या आहेत. चिखलीतील ग्रामस्थांनी हे आव्हान स्विकारले आणि त्यांच्या नव्याने निवडलेल्या ग्राम विकास समितीच्या संघाअंतर्गत हा प्रस्ताव तयार करून तो सादर करण्यात आला. हा प्रस्ताव कु. वालेरी अफोन्सो यांच्याहस्ते सरपंच कमलाप्रसाद यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी रूपा नाईक, संजय म्हाळसेकर, सिंथीया लिमा लैतांव मिरांडा व सीरील फर्नांडिस उपस्थित होते. वालेरी अफोन्सो हिने सरंपच श्री यादव यांना नवीन आर्थिक योजनांविषयी माहिती दिली. त्यांनी यावेळी सरपंचाना स्थानिक आमदार माविन गुदिन्हो यांच्यासमवेत ग्राम विकास समितीच्या सदस्यांची बैठक घडवून आणण्याची विनंती त्यांनी सरपंचांना केली.
चिखलीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुरूज्जीवन योजनेत नमूद केलेल्या पर्यायांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण विकास समितीच्या संघाने सरपंचाना इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लीक एडमिनीस्ट्रेशन व ग्रामीण विकास संस्थेच्या नोडल एजन्सीचे मार्गदर्शन घ्यावे अशी विनंती केली.
सदर योजना शाश्वत व रोजगार निर्मिती करण्यासाठी उपयुक्त असून शेती व मत्स्यपालन सुधारण्यासाठी भर देणारीही आहे. चिखली ग्रामविकास समितीचे सदस्य प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एम. ए. सुंदरम यांनी चिखली पंचायत क्षेत्रात येणाऱया चिखली, दाबोळी व सेंट जासिंतो या गावच्या आर्थीक पुनरूज्जीवनाचा प्रस्ताव सरपंचाकडे सादर केला. सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी चिखली गावच्या आर्थीक विकास योजनेतील विकासाच्या प्रस्तावाचे स्वागत केले.