माशे – आगस येथे दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीला बंद
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात मागच्या दोन दिवसांत पावसाने भरपूर जोर धरला असून एकाच दिवसात साडेतीन इंच इतक्या पावसाची नोंद या तालुक्यात झाली आहे. नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गुळे, चार रस्ता, देवाबाग, गालजीबाग आणि अन्यत्र रस्त्यांवर पाणी साचले आहे. गालजीबाग, तळपण नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. कुसके, बामणबुडा हे धबधबे फेसाळल्याप्रमाणे वाहत आहेत. मात्र कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे या धबधब्यांची मजा घेण्यापासून पर्यटक वंचित झालेले आहेत.
सततच्या पावसाच्या माऱयामुळे आगस, माशे येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. या रस्त्याच्या दुसऱया बाजूला निवासी घरे असून रस्त्यावर दरड पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीला बंद झाला. याची खबर मिळताच या वॉर्डाचे पंच भूषण प्रभुगावकर, माजी सरपंच अजय लोलयेकर, निशांत प्रभुदेसाई, शैलेश पागी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यापूर्वी देखील या भागात दरड कोसळली होती. विद्यमान आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याच्या दृष्टीने लक्ष घालावे, अशी मागणी पंच प्रभुगावकर यांनी केली आहे. दरम्यान, आगस-माशे येथे दरड कोसळून रस्ता वाहतुकीला बंद झाल्याचे समजताच काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी या जागेला भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील माती बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या कामाला प्रारंभ केला. काणकोणच्या मामलेदार कार्यालयातील नियंत्रण कक्ष सतर्क झालेला असून 24 तास खुला ठेवण्यात आला आहे. अद्याप या तालुक्यात अन्य अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही, अशी माहिती मामलेदार दलाल यांनी दिली. मात्र पावसासहित येणाऱया वादळी वाऱयामुळे बऱयाच ठिकाणी झाडांची पडझड होण्याच्या घटना घडल्या आहेत.