35 तोळे सोने, चांदीचा ऐवजासह 30 हजार रुपये लंपास
प्रतिनिधी/ वडूज
कातरखटाव येथील भरवस्तीत असणारे एक बंद घर शुक्रवारी चोरटय़ांनी लक्ष करत भरदिवसा घरातील 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचा ऐवज व 30 हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. चोरटय़ांनी कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव येथील तानाजी देशमुख यांचे घरापासून जवळच मुख्य रस्त्यावर केशव मेडीकल हे दुकान आहे. तर विठ्ठल मंदिराच्या पाठीमागील बाजूस केशव निवास हे दुमजली राहते घर आहे. घर परिसरात दाट लोकवस्ती आहे. देशमुख सकाळी मेडिकलमध्ये आले होते. तर पत्नी सारिका या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घर बंद करून मेडीकलमध्ये गेल्या होत्या. त्यांचा मुलगा तेजस हादेखील काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरासमोर त्यांचे पाळीव कुत्रे बांधले होते. देशमुख दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उचकटलेला व त्याचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच त्यांचे कुत्रे देखील त्याठिकाणी निपचीत पडले होते. त्यावरून त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. देशमुख यांच्या बंद घरावर लक्ष ठेवत व घरात कोणी नसल्याची खात्री करून चोरटय़ांनी मांसामध्ये गुंगीचे औषध टाकुन कुत्र्याला खायला दिले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चोरटय़ांनी घराच्या दरवाजाचे दार व कुलूप कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट, देव्हारा, भांडी, संडास बाथरूमवरील साहित्य देखील उलथेपालथे केले होते. देशमुख यांनी संडास बाथरूमच्यावर एका कापडी पिशवीमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज एका लोखंडी घमेल्याखाली झाकून ठेवला होता. चोरटय़ांनी हे दागिने व ऐवज लंपास केला. तसेच घरातील लाकडी कपाटातील 30 हजार रूपयांची रोख रक्कमही चोरून नेली.
कातरखटावसारख्या मोठय़ा लोकवस्तीच्या गावात दिवसा ढवळ्या झालेल्या या जबरी चोरीच्या प्रकाराने गाव परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनास्थळी मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल पालेकर यांनी भेट दिली. सातारा येथील ठसे तज्ञ व श्वान पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. चोरटय़ांनी चोरीतील कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांसमोर या गुन्हय़ाच्या तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
घरात नाग शिरल्याचे कारण… अन् घराची टेहळणी…
गुरूवार दि. 14 रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात दोन युवक तुमच्या घरात देवाचा नाग शिरला असल्याचे कारण सांगून आले होते. त्यावेळी ते त्याठिकाणी काही वेळ थांबले होते. देशमुख यांचा मुलगा तेजस याने तुम्हाला कुत्रे चावेल असे सांगत त्यांना तेथून बाहेर काढले. त्यामुळे संबंधित अज्ञातांनी घरात नाग शिरल्याचे कारण सांगत घराची टेहाळणी केली असावी असा संशय व्यक्त होत आहे.