वडूज / प्रतिनिधी :
कातरखटाव (ता. खटाव) येथे आज सकाळी 9 वाजता सांगलीहून गाझीयाबाद येथे बेदाणा घेवून निघालेला ट्रक पलटी झाला. या अपघातात 2 जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.
या बाबत सविस्तर माहीती अशी की, मिरज-भिगवण हा राज्य मार्ग कातरखटाव गावातून जातो. या मार्गावरून आज सकाळी 9 वाजता बेदाण्याने भरलेला ट्रक ( क्र. RJ 11 GB 4146 ) सांगलीहुन गाझीयाबादकडे निघाला होता. हा ट्रक विजयराज हॉटेलच्या समोर आला असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला साईड देत असताना चाके रस्त्यावरुन खाली उतरली. रस्त्याची साईडपटटी खोल असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि दुध घालण्यासाठी निघालेल्या कातरखटावच्या सतिश जंगम (वय 47) या युवकास ट्रकने धडक दिली. त्यानंतर पुढे शंभर मीटरवर जावून हा ट्रक पलटी झाला. मोठा आवाज झाल्याने आजुबाजूचे लोक गोळा झाले व ट्रकमध्ये असणाऱ्या दोघांना बाहेर काढले. यामध्ये ट्रकचा क्लिनर ब्रिजेश पाल (वय 27) हा किरकोळ जखमी झाला. तर सतीश जंगम यांच्या डोक्यास जोरात धडक दिल्याने ते बेशुद्ध आहेत. ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील बेदाण्याची बॉक्स अस्ताव्यस्त पडलेली आहेत.