प्रतिनिधी/ वास्को
नवीन झुआरी पुलाच्या कामात गुंतलेल्या 112 कामगारांनी वेतनाच्या मागणीसाठी सध्या काम बंद ठेवले आहे. वेतन मिळत नसल्यास काम सोडण्याचीही तयारी त्यांनी चालवली आहे. हे कामगार वेतनाच्या मागणीसाठी गेले तीन दिवस काम बंद ठेवून आहेत. या प्रकारामुळे पुलाच्या पुढील कामावर परीणाम होण्याची शक्यता आहे.
यासंबंधी डीबीएल कंपनीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलाच्या कामात गुंतलेल्या 112 कामगारांना मागच्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हे कामगार गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवून वेतनाची मागणी करीत होते. कंपनीच्या अधिकाऱयांनी त्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. मात्र, कामगारांनी वेतन मिळाल्याशिवाय काम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांनी अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे कंपनीच्या सेवेचा राजीनामा देण्याचीही तयारी चालवली आहे. हे कामगार परप्रांतीय कुशल कामगार असून त्यांनी कंपनीकडे पाठ फिरवल्यास पुलाच्या कामावर परीणाम होण्याची शक्यता आहे. हे कामगार गेल्या तीन वर्षांपासून पुलाच्या कामात आहेत.