डिमिट्रोव्ह, हॅलेप, सीह, व्हेरेव्ह स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाचा पात्र फेरीतून आलेला असलन कारात्सेव्ह, अग्रमानांकित जोकोविच यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले तर सिमोना हॅलेप, सीह सु वेई, ग्रिगोर डिमिट्रोव्ह, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
तिसऱया मानांकित ओसाकाने सलग 19 वा विजय मिळविताना सु वेईवर 6-2, 6-2 असा सहज विजय मिळविला. तिची उपांत्य लढत सेरेना विल्यम्सशी होणार आहे. ‘सहसा मी ड्रॉ पाहत नाही. पण प्रत्येकजण माझ्या ड्रॉबद्दल सांगितले असल्याने माझी पुढची प्रतिस्पर्धी कोण आहे, हे पाहणे क्रमप्राप्त झाले आहे,’ असे ओसाका म्हणाली. सेरेना तिची प्रतिस्पर्धी असणार हे माहित झाल्यानंतर तिच्याबद्दल बोलताना ओसाका म्हणाली की, ‘ती सेरेना आहे. जेव्हा कोर्टवर मी तिला दुसऱया बाजूला पाहते तेव्हा तिची मला खूपच दहशत वाटते.’ ओसाका-सेरेना यांच्यात होणारी ही आजवरची चौथी लढत असेल. याआधीच्या तीनही लढती हार्डकोर्टवरच झाल्या होत्या. त्यात ओसाकाने 2 व सेरेनाने एकदा विजय मिळविला आहे. 2018 च्या अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत झालेली या दोघींची लढत सर्वात संस्मरणीय ठरली होती. ओसाकाचे ते पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेत तिसरे ग्रँडस्लॅम जिंकल्यापासून ओसाकाची विजयी घोडदौड सुरू आहे. गेल्या आठवडय़ात तिने चौथ्या फेरीत गार्बिन मुगुरुझाचा पराभव करून आगेकूच केली होती. ओसाकाने 2019 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
हॅलेप पराभूत
सेरेना विल्यम्सने द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 2017 मध्ये सेरेनाने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते, त्यानंतर प्रथमच तिने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. तिने आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावली असून 24 वे जेतेपद मिळवित मार्गारेटच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या दिशेने तिने आगेकूच केली आहे. गुरुवारी ओसाका-सेरेना यांच्यात उपांत्य लढत होणार आहे.
कारात्सेव्हचा डिमिट्रोव्हला धक्का
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत 114 व्या स्थानावर असणाऱया व येथील स्पर्धेत पात्रता फेरीतून आलेल्या रशियाच्या असलन कारात्सेव्हने 18 व्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हला 2-6, 6-4, 6-1, 6-2 असा पराभवाचा धक्का देत पदार्पणाच्या ग्रँडस्लॅममध्येच उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेच्या युगातील असा पराक्रम करणारा तो पाचवा टेनिसपटू आहे. पहिल्या सेटमध्ये त्याला लय सापडली नाही. पण दुसऱया सेटपासून स्थिरावल्यावर त्याने आणखी एक धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याची उपांत्य लढत नोव्हॅक जोकोविचशी होईल. डिमिट्रोव्हला पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्याने तिसऱया सेटवेळी टाईमआऊट घेत उपचार करवून घेतले. सर्वात कमी मानांकन असलेल्या खेळाडूने ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची गेल्या दोन दशकातील ही पहिलीच वेळ आहे.
व्हेरेव्ह स्पर्धेबाहेर, जोकोविच विजयी अग्रमानांकित जोकोविचने जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान 6-7 (6-8), 6-2, 6-4, 7-6 (8-6) असे परतावून लावत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. ग्रँडस्लॅम स्पर्धांत उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही 39 वी वेळ आहे. या सामन्यात त्याला सर्व्हिसची चांगली साथ मिळाल्याने 23 वेळा बिनतोड सर्व्हिस केली. पहिल्या सेटमध्ये कडवा संघर्ष करूनही जोकोविचला तो गमवावा लागला आणि नंतरच्या दोन सेटमध्येही तो पिछाडीवर पडला होता. पण नंतर त्याने नियंत्रण मिळवित हे दोन्ही सेट्स जिंकले. शेवटचा सेटही अटीतटीचा झाला. पण 23 व्या बिनतोड सर्व्हिसवर त्याने व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात आणले.