चेन्नई : माजी वर्ल्ड चॅम्पियन भारताच्या विश्वनाथन आनंदला चेस 24 लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या फेरीत पीटर स्विडलरकडून पराभूत झाल्यानंतर दुसऱया फेरीत त्याला वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने हरविले.
दुसऱया फेरीतील पहिल्या तीन डावात आनंदने कार्लसनला रोखण्यात यश मिळविले होते. पण चौथ्या डावात कार्लसनने विजय मिळविला आणि चार डावांची ही लढत 2.5-1.5 अशा फरकाने जिंकली. पहिल्या फेरीत रशियाच्या स्विडलरकडूनही आनंदला याच फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मॅग्नस कार्लसन चेस टूरवरील या स्पर्धेत आनंदने पहिल्यांदाच भाग घेतला आहे. तिसऱया फेरीत त्याची लढत आणखी एक माजी वर्ल्ड चॅम्पियन ब्लादिमिर क्रॅमनिकशी होणार आहे. दोन फेऱयानंतर कार्लसन इस्रायलचा बोरिस गेलफँड व स्विडलर यांच्यासमवेत 6 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहे.
तिघांनीही दोन विजय मिळवित 6 गुणांची कमाई केली आहे.
गेल्या मेमध्ये जर्मनीत असताना नेशन्स कप ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये दिसत आहे.
दोन फेऱयानंतर कार्लसन इस्रायलचा बोरिस गेलफँड व स्विडलर यांच्यासमवेत संयुक्त आघाडीवर आहे. तिघांनीही दोन विजय मिळवित 6 गुणांची कमाई केली आहे. अनिश गिरीने क्रॅमनिकवर विजय मिळवित गुणांचे खाते खोलले तर जागतिक तृतीय मानांकित डिंग लिरेनचा संघर्ष पुढे चालू असून या फेरीत त्याला रशियाच्या इयान नेपोमनियाचीकडून पराभव पत्करावा लागला. राऊंडरॉबिन पद्धतीने खेळविल्या जात असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी फेरीत चार डाव खेळले जात आहेत. ही स्पर्धा कार्लसन चेस टूरचा भाग असून येथील विजेता या टूरच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. ग्रँड फायनल 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार असून 3 लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या टूरचाच भाग असलेल्या चेसेबल मास्टर्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेले कार्लसन, लिरेन, नेपोमनियाची, गिरी यांना लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. त्यांना या स्पर्धेत 40 ते 52 या वयोगटातील सहा महान बुद्धिबळपटूंविरुद्ध खेळावे लागत असून या वयस्कर खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत केव्हा ना केव्हा अव्वल स्थानापर्यंत मजल मारली होती.