प्रतिनिधी/ संकेश्वर
भरधाव वेगाने जाणाऱया कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात निपाणी येथील तंबाखू व्यापारी प्रकाश दुंडाप्पा लिगाडे (वय 72 रा. अशोकनगर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 4.45 च्या सुमारास मसोबा हिटणीनजीकच्या हॉटेल हिलपॅलेससमोरील राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर घडला. या अपघातामध्ये एम. डी. पाटील (रा. बसवान नगर, निपाणी) व चालक नितेश निवृत्ती केसरकर हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश लिगाडे हे चालक नितेश व दिवाणजी एम. डी. पाटील यांच्याबरोबर कामानिमित्त कारने निपाणीहून बेळगावच्या दिशेने जात होते. दरम्यान मसोबा हिटणीनजीक कार येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाशेजारी असणाऱया झाडावर जाऊन आदळली. यात प्रकाश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर नितेश व एम. डी. पाटील हे जखमी झाले. यानंतर जखमींना उपचारासाठी नेताना प्रकाश यांचा मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. अपघातस्थळी पायोलियन कंपनीचे एम. आर. घाटगे व त्यांच्या सहकाऱयांनी भेट दिली. मयत अशोक यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.