प्रतिनिधी/ देवरुख
गावी मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त मुंबईहून येताना देवरुख-रत्नागिरी मार्गावरील वाशी फाटा येथे स्विफ्ट गाडी उलटून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, या बाबतची फिर्याद प्रथमेश प्रकाश हळदणकर (निवेबुद्रुक पाष्टेवाडी) यांनी दिली. अपघातामध्ये दीपिका दीपक सावंत (50) व भागीरथी दगडू सावंत (85) या दोन महिलांचा मृत्यू झाला तर प्रकाश हळदणकर व शुभम दीपक सावंत जखमी झाले आहेत. वाशी तर्पे देवरूख येथील निनावी देवी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय गुरुवारी मुंबईहून गावी येत होते. यापैकी प्रथमेश आपल्या ताब्यातील स्विफ्ट गाडी (एमएच 02, सीआर 5241) चालवत होते. वाशी फाटानजीक त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी गटारात उलटली होती.
अपघाताची खबर मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दीपिका सावंत व भागीरथी सावंत यांच्या शवाचे संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी प्रथमेश हळदणकर याच्यावर भादंविक 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.