खोऱयात एकाचवेळी 15 हून अधिक चित्रपटांचे चित्रिकरण , निर्मात्यांकडून चित्रपटासाठी ठिकाणांचा शोध सुरू
काश्मीरमध्ये बॉलिवूडने दमदार पुनरागमन केले आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच काश्मीर खोऱयात 15 हून अधिक चित्रपट, वेबसीरिज, व्हिडिओ अल्बम आणि जाहिरातींचे चित्रिकरण सुरू आहे. डल सरोवर, मुगल गार्डन, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या सुंदर ठिकाणी चित्रिकरण होतेय.
सद्यकाळात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कित्येक निर्माते स्वतःच्या चित्रपटांसाठी ठिकाणांचा शोध घेण्याकरता खोऱयात आहेत. बॉलिवूडचे 24 सदस्यीय पथकही काश्मीरच्या चार दिवसीय दौऱयावर आहे. यात अजय देवगण फिल्म्स, संजय दत्त प्रॉडक्शन, रिलायन्स एंटरटेन्मेंट, रोहित शेट्टी फिल्म्स, झी स्टुडियोज, अधिकारी ब्रदर्स अँड एसएबी (मराठी), एंडमोल, राजकुमार हिरानी, एक्सेल एंटरटेनमेंटसह प्रॉडय़ुसर्स गिल्ड, मुंबईचे प्रतिनिधी सामील आहे.
गुलमर्ग हाउसफुल्ल
निर्मात्यांनी मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावल्याने खोऱयातील हॉटेल्स हाउसफुल्ल झाली आहेत. गुलमर्ग येथे तर फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हॉटेल्स हाउसफुल आहेत. यापूर्वी 2016 मध्ये काश्मीरच्या विविध हिस्स्यांमध्ये असे चित्रिकरण दिसून आले होते. चित्रिकरणाचा तेथील पर्यटनउद्योगावर सकारात्मक प्रभाव पडतो. एक मोठा चित्रपट आणि छोटे चित्रिकरणही शेकडो रोजगार निर्माण करतो.
दाक्षिणात्य चित्रपटांचेही चित्रिकरण
सद्यकाळात कित्येक चित्रपटांची पथके काश्मीरात आहेत. यातील काही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहू इच्छितात. अभिनेत्री हिना खानने काश्मीरमध्ये स्वतःच्या ‘लायन्स’ चित्रपटाचे चित्रिकरण केले आहे. निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही काश्मिरी पंडितांवरील स्वतःच्या चित्रपटातील काही दृश्ये चित्रित केली आहेत. हिंदी, पंजाबी तसेच दाक्षिणात्य चित्रपटही तेथे चित्रित करण्यात येत आहेत. 777 चार्ली आणि रतन प्रपंच या कन्नड चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात येत आहे. गुलमर्गमध्ये जानेमन या मल्याळी चित्रपटाचे चित्रिकरण पार पडले आहे.