ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर दीडशे मीटर लांबीचे भुयार सीमा सुरक्षा दलाने शोधून काढले आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी हे भुयार वापरत असल्याचा संशय सुरक्षा दलाने व्यक्त केला आहे.
पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू- श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथे चकमकीदरम्यान शोधमोहीम सुरू असताना दीडशे मीटर लांबीचे भुयार आढळले. नगरोटा येथे नुकत्याच झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी या भुयाराचा वापर केल्याचा संशय आहे.
या भुयाराच्या तोंडावर गवत झुडपे वाढलेली होती. 150 मीटर भुयार 5×5 व्यासाचे आहे. जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना या भुयारामार्गे काश्मिरात घुसवण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याचे सांगण्यात येते.