वार्ताहर / कास :
कास पठारावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढत असून, आतापर्यंत गेल्या 25 दिवसांत तब्बल 30 हजारांहून अधिक पर्यटकांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला आहे.
बदलत्या हवामानाचा फटका कास पठारालाही बसल्याने फुलांचे प्रमाणही कमी आहे. मात्र चार दिवसांपासुन पावसाने उघडीप दिल्याने ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. त्यामुळे पठारावर नेहमी जास्त प्रमाणात येणारी व मोठया प्रमाणात सर्वत्र गालीचे तयार करणारी गुलाबी तेरडा पांढरा निळा जातीचा गेंद ( धनगरी फेटा ) आदी जातींच्या फुलांना बहर चढू लागला असुन, गुलाबी पांढऱ्या निळ्या रंगाची झलक दिसु लागली असुन काही ठिकाणी फुलांचे गालीचे तयार झाले आहेत.
पठारावर ऑनलाईन बुकींगसह ऑफलाईन तिकीट देऊन प्रवेश मिळत असल्याने देशासह विदेशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यातच वनसमीतीच्या चोख नियोजनामुळे मोठी गर्दी टाळता येत असुन काही वेळेला बस कमी पडत असल्याने बससाठी पर्यटकांची रांग लागत असल्याचे दिसुन येत आहे. सुट्टीच्या दिवशी कासाणी वाहनतळावरील पार्किंग फुल झाल्याने कास तलाव कडील वाहनतळात वाहने पाठवली जात होती.