भारतातून विषाणू फैलावल्याचा कांगावा : जागतिक रोषाने त्रस्त, जगभरात कोरोना फैलावणाऱया चीनचा कपोकल्पित आरोप
जगभरात कोरोना विषाणू महामारी फैलावणारा चीन स्वतःच्या विश्वासघाती वृत्तीतून बाहेर पडत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणूला जगभरात फैलावण्याचा दोष चीन आता भारताच्या माथी फोडू पाहत आहे. कोरोना विषाणू भारतातूनच पूर्ण जगात फैलावल्याचा अजब दावा चीनच्या काही वैज्ञानिकांनी केला आहे. क्षी जिनपिंग अध्यक्ष असलेला चीन आता कोरोना महामारी फैलावण्याचे पाप दुसऱयाच्या माथी मारू पाहत आहेत. परंतु क्षी जिनपिंग यांना कोरोना महामारीमुळे जगभरातील देश चीनच्या विरोधात एकवटू लागल्याची जाणीव होऊ लागली आहे.
शांघाय इन्स्टीटय़ूट फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी एका संशोधनपत्राचा उल्लेख करत डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्यापूर्वी कोरोना विषाणू भारतीय उपखंडात अस्तित्वात होता, असा बिनबुडाचा दावा केला आहे. कोरोना विषाणूच्या आनुवांशिक कोडची तपासणी करणाऱया चिनी वैज्ञानिकांनी चीनमध्ये विषाणूच उत्पत्ती झाली नसल्याचे पुरावे असल्याचा दावा केला आहे.
तरुणांमुळे फैलाव
हे संशोधनपत्र 17 देशाच्या कोरोना विषाणू स्ट्रेनवर संशोधन करून प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. शेन लीबिंग यांनी केले आहे. भारताची तरुण लोकसंख्या, अत्यंत खराब हवामान आणि दुष्काळामुळे अशी स्थिती निर्माण झाली असेल आणि याचमुळे हा विषाणू माणसांमध्ये पोहोचल्याचा दावा या संशोधनात चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडण्याच्या 3 ते 4 महिन्यांपूर्वी कोरोना भारतीय उपखंडात फैलावला होता, याचे संकेत मिळाल्याची थापही त्यांनी मारली आहे. भारत आणि बांगलादेश दोन्ही कमी उत्परिवर्तनासह नमुने नोंदवत आहेत आणि भौगोलिकदृष्टय़ा शेजारी असल्याने तेथे सर्वप्रथम फैलाव झाला असल्याची शक्यता असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
वुहानमध्ये मिळाला नाही मूळ विषाणू वुहानमध्ये आढळून आलेला विषाणू मूळ कोरोना विषाणू नसल्याचा दावा चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. तपासात कोरोना विषाणू बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, चेक प्रजासत्ताक, रशिया किंवा सर्बियात निर्माण झाल्याचे संकेत मिळाले. भारत आणि बांगलादेशात सर्वात कमी म्युटेशनयुक्त नमुने मिळाले असून दोघेही चीनचे शेजारी देश आहेत. याचमुळे सर्वप्रथम संक्रमण तेथेच झाले असल्याची शक्यता आहे. विषाणूच्या म्युटेशनमध्ये लागणारा कालावधी आणि या देशांमधून प्राप्त नमुन्यांच्या आधारावर चिनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये सर्वप्रथम फैलावला असावा, असा विचित्र दावा चिनी वैज्ञानिकांनी केला आहे.