बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : श्रीकांतचे पदक निश्चित, ताय झु यिंगची सिंधूवर मात
वृत्तसंस्था/ हुएल्व्हा, स्पेन
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विद्यमान विजेत्या भारताच्या पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले तर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले.
पुरुष एकेरीत माजी अग्रमानांकित के. श्रीकांतने नेदरलँड्सच्या मार्क कॅल्जोवचा 21-8, 21-7 असा केवळ 26 मिनिटांत फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठत त्याने यावर्षीचे भारताचे या स्पर्धेतील पहिले पदकही निश्चित केले. याशिवाय त्याचेही हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पहिले पदक असेल. तसेच पुरुष एकेरीत भारताने या स्पर्धेत मिळविलेले हे एकूण तिसरे पदक असेल.
12 वे मानांकन मिळालेल्या श्रीकांतने मार्कविरुद्ध ब्रेकपर्यंत 11-5 अशी आघाडी घेतली होती आणि चपळ व अचूक खेळाचे प्रदर्शन करीत त्याने हा गेम 21-8 असा घेतला. दुसऱया गेममध्ये मार्कने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकांतने आपले वर्चस्व कायम ठेवत त्याला फारशी संधी दिली नाही आणि गेमसह सामना जिंकून आगेकूच केली.
सिंधूचे आव्हान समाप्त
तत्पूर्वी, महिला एकेरीत विद्यमान विजेत्या असलेल्या पीव्ही सिंधूला आपले जेतेपद स्वतःकडेच राखण्यात अपयश आले. तिला चिनी तैपेईच्या अग्रमानांकित ताय झु यिंगकडून सरळ गेम्सनी पराभव स्वीकारावा लागला. 42 मिनिटांच्या खेळात यिंगने सिंधूवर 21-17, 21-13 अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. या दोघांत झालेली ही आजवरची 20 वी लढत होती. त्यापैकी 15 यिंगने तर 5 लढती सिंधूने जिंकल्या आहेत.
यापूर्वी अनेकदा दिसून आल्याप्रमाणे सिंधूला या लढतीतही यिंगचा वेग, कोर्टवरील व्यापक हालचाली, ड्रॉप शॉट्स यांच्याशी जुळवून घेणे कठीण गेले. सिंधूने अधूनमधून क्रॉसकोर्ट स्मॅशेसचा चांगला उपयोग केला तरी तिला अनेकदा अनियंत्रित चुकांचा फटका बसला. दुसऱया गेममध्ये 12-12 पर्यंत तिने यिंगला गाठण्याचा प्रयत्न केला. पण अखेर यिंगनेच बाजी मारत विजय साकारला. टोकियो ऑलिम्पिकमध्येही तिला यिंगकडून उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने याच टप्प्यावर यिंगला नमविले होते. त्याची परतफेड यिंगने या लढतीत केली.