कन्नड साहित्यासाठी डी. एस. नागभूषण यांना तर कोकणीसाठी संजीव वेरेकर यांना पुरस्कार
मराठीतील पुरस्कार विजेते…
- मुख्य पुरस्कार : किरण गुरव – ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’
- युवा पुरस्कार : प्रणव सखदेव – ‘काळेकरडे स्ट्रोक्स’
- बाल पुरस्कार : संजय वाघ – ‘जोकर बनला किंगमेकर’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
साहित्य अकादमीने यंदाचे प्रतिष्ठिचे ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर केले आहेत. साहित्य अकादमीने गुरुवारी 20 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार-2021 जाहीर केले. यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी हिंदी साहित्यासाठी ज्ये÷ साहित्यिक दया प्रकाश सिन्हा आणि इंग्रजीसाठी नमिता गोखले यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मराठीत मुख्य पुरस्कार किरण गुरव यांचा कथासंग्रह ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ यांना जाहीर झाला आहे. तसेच कन्नड साहित्यासाठी डी. एस. नागभूषण यांच्या ‘गांधी कथा’ या चरित्राला आणि कोकणी साहित्यासाठी संजीव वेरेकर यांच्या ‘रक्तचंदन’ काव्यसंग्रहाला घोषित करण्यात आला.
20 भारतीय भाषांमधील ज्युरी समित्यांनी पुरस्कारांची शिफारस केली होती. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत गुरुवारी पुरस्कार विजेत्यांच्या यादीला मान्यता देण्यात आली. मराठीतील युवा लेखक प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून ‘जोकर बनला किंगमेकर’ या पुस्तकासाठी संजय वाघ यांना बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे. मुख्य पुरस्कारांबरोबरच एकूण 22 प्रादेशिक भाषांसाठी युवा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 50,000 रुपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार 2021 साठी निवडलेल्या कलाकृतींमध्ये सात काव्यसंग्रह, पाच कथासंग्रह, दोन कादंबऱया, दोन नाटके, एक चरित्र, एक आत्मचरित्र, एक महाकाव्य आणि एक समीक्षाग्रंथ यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये रोख, ताम्रपट, शाल आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हिंदीसाठी दया प्रकाश सिन्हा, इंग्रजीसाठी नमिता गोखले यांची निवड ज्येष्ट लेखक आणि नाटककार दया प्रकाश सिन्हा यांना हिंदी साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या ‘सम्राट अशोक’ या नाटकाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ते एक प्रतिष्ठितत लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि हिंदीचे प्रसिद्ध इतिहासकार आहेत. ते विविध राज्यांच्या प्रशासकीय सेवेतही कार्यरत होते. साहित्य अकादमीने नमिता गोखले यांच्या ‘थिंग्ज टू लिव्ह बिहाइंड’ या कादंबरीची इंग्रजी साहित्याच्या अकादमी पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्या प्रसिद्ध लेखिका, संपादक आणि प्रकाशक आहेत. त्या साहित्य विश्वातील प्रतिष्ठित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि सह-संचालक आहेत. अन्य 20 भाषांसाठीही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.