बेळगाव / प्रतिनिधी
येथील शिवछत्रपती सेवा संघ बेळगाव आयोजित किल्ले राजगड ते रायगड पदभ्रमंती नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. प्रारंभी शिवमंदिरात पेरणामंत्र म्हणून या पदभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. सईबाई समाधीचे पूजन साईराज शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राजगडावरील दारूकोठार, राजसदर, गुंजवणे दरवाजा, बालेकिल्ला, संजीवनी, माची पाली दरवाजा, पद्मावती माची पाहून पद्मावती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दुसऱया दिवशी किल्ले तोरणावर वेल्हामार्गे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे यांच्या दुधाई धाराऊ माता यांच्या समाधीचे पूजन सुनील रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धाराऊ यांचे 13 वे वंशज अमित गाडे पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम करण्यात आला. तिसऱया दिवशी किल्ले रायगडावरील चित्र दरवाजा महादरवाजामार्गे होळीच्या माळावरील राजदरबारातील सिंहासनास मुजरा करून बाजारपेठ, टकमक टोकमार्गे, जगदीश्वर मंदिरातील शिवपिंडीस वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे पूजन स्वराज्य रेडेकर यांच्या हस्ते करून ध्येयमंत्राने पदभ्रमंतीची सांगता करण्यात आली.
या पदभ्रमंतीत अध्यक्ष विनायक शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुनील रेडेकर, साईराज शेट्टी, स्वराज्य रेडेकर, गणेश ढेबे आदींनी सहभाग घेतला होता. पदभ्रमंती यशस्वी करण्यासाठी राजू शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.