आमदार क्लाफासियो डायस यांचा पुढाकार, पालिकेच्या व्यावसायिक इमारतीतील जागेची निवड
प्रतिनिधी/कुंकळ्ळी
कुंकळ्ळीत ‘स्टेप-अप इस्पितळ’ सुरू करण्याची तयारी आमदार क्लाफासियो डायस यांनी चालविली असून ही सोय जी-सुडाने बांधलेल्या व नुकतेच ज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्या कुंकळ्ळी पालिकेच्या व्यावसायिक इमारत प्रकल्पामधील दुसऱया मजल्यावर करण्याची तजवीज झाली आहे. हे स्टेप-अप इस्पितळ सुरू झाल्यानंतर कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी ते खूप सोईस्कर होईल याच विचाराने आमदार डायस यांनी हा विषय लावून धरला होता.
शनिवारी दुपारी मामलेदार प्रताप गावकर व बाळळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. ममता काकोडकर यांच्यासह आमदार डायस यांनी इमारतीची पाहणी करून खातरजमा करून घेतली. कुंकळ्ळीतील स्टेप-अप इस्पितळात सर्व कोविड सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमदार डायस यांनी केलेल्या मागणीला सरकारने मान्यता दिली आहे. इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील चार लघुसभागृहांत 24 खाटांची सोय असलेले स्टेप-अप इस्पितळ उभारण्यासाठी प्रयत्न चालविण्यात आले असून पुढच्या आठवडय़ापर्यंत ते सुरू करण्याची तयारी जवळपास झाली आहे.
आमदार डायस, डॉ. काकोडकर व मामलेदार गावकर यांनी केलेल्या चर्चेअंती कोविड उपचारांसाठी चार मोठय़ा खोल्यांत प्राणवायूची सोय असलेल्या 24 खाटांचे स्टेप-अप इस्पितळ उभारण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूची व खाटांची सोय आपण करणार असल्याचे डायस यांनी सांगितले. पुंकळळी भागात कोविड रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून येथील रुग्णांना सर्वतो औषधोपचार व इतर वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोविड महामारीला लगाम घालण्यासाठी व लोकांचे प्राण वाचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न सरकार करत असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गरज भासल्यास आणखी खाटा वाढविण्याची तयारी ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. काकोडकर यांनी यावेळी माहिती देताना, स्टेप-अप इस्पितळासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास कुंकळ्ळीत ही सुविधा सुरू करण्याची बाळ्ळी आरोग्य केंद्राची तयारी असल्याचे सांगितले. यासाठी स्थानिक समाजसेवी संस्थांनी व कुंकळ्ळीच्या नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन काकोडकर यांनी केले आहे.